Kolhapur: थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी ‘पुईखडी’वर येणार, आमदार सतेज पाटील यांची माहिती

0
102

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांचे कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली असून, योजनेचे पाणी नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीतून सोमवारी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येईल, अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

‘योजनेच्या मंजुरीसाठी तसेच पूर्ततेसाठी राजकीय ताकद पणाला लावली होती, त्यामुळे योजना पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका सभागृहातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसमवेत गुरुवारी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, तेथे उभारण्यात आलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र तसेच स्काडा यंत्रणा कक्षाची पाहणी केली.

काळम्मावाडी धरण क्षेत्रापासून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुईखडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीचे कामही पूर्ण होत आले आहे. संपूर्ण योजनेवर तसेच जलवाहिनीच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या अत्याधुनिक स्वयंचलित स्काडा यंत्रणेचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा काळम्मावाडी धरणातील पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात येईल, त्यावेळी ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

धरणक्षेत्र ते पुईखडी या मार्गावर १८०० एमएम जाडीची स्पायरल वेल्डेड जलवाहिनी, तर पुईखडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरणपर्यंत ६०० एमएम जाडीची जलवाहिनी घालण्यात आली आहे. नव्या योजनेत ४० एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून, जुन्या ६० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकर केंद्रही कार्यान्वित राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here