कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या चार दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली.
तोडफोडीच्या सर्व गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलनात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथील पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आंदोलकांच्या संपर्कात आहेत.
उपोषण, मोर्चे, निदर्शने, कॅण्डल मार्च, रास्ता रोको, नेत्यांना गावबंदी करणे अशा घडामोडींवर पोलिसांची नजर आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या दौ-यांमध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी वाढीव बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सर्व पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांबाहेरही बंदोबस्त तैनात केला आहे. क-हाड, तासगाव येथील मोर्चे आणि सातारा जिल्हा बंद शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश आले.
आंदोलनांमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवरील वाहतूक खंडित होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊ नये यासाठी संवेदनशील परिसरात एसटीच्या काही फे-या रद्द करण्याचे आवाहन पोलिसांनी एसटी महामंडळास केले आहे. गेल्या चार दिवसात सोलापूर ग्रामीण परिसरात ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली. शिरोळ येथेही एका एसटीवर दगडफेक झाली. सर्व १२ गुन्हे दाखल झाले असून, दगडफेक करणा-या संशयितांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.