गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. यासाठी अनेक वर्ष लढा सुरू आहे. गेले काही महिने मनोज जरांगे पाटील या सर्वसामान्य नेतृत्वाने या आरक्षण प्रश्नाला मोठी वाचा फोडली आहे.
आता तर जरांगे पाटील हे आमरण उपोषण करून स्वतःचा प्राण देण्यासाठी ही तयार झाले आहेत. हे पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये मराठा बांधव आपला आक्रोश आणि भावना व्यक्त करीत आहे.
याला अनेक बहुजन संघटनांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या आदेशाने सकल मराठा समाजाला पाठिंबा देण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तुमचं आमचं नातं काय जय भीम जय शिवराय, आमच्या थोरल्या भावाला आरक्षण द्या. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर दसरा चौक येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलन नेत्यांकडे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ. व युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पाठिंबाचे पत्र दिले.
यावेळी अविनाश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, वैभव प्रधान यांनी आपली मनोगते व्यक्त केली.मराठा व दलित समाजाचे ऋणानुबंध सामाजिक समतेच्या माध्यमातून एकरूप आहेत.
छ. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणानुबंध हे ज्या वेळेला आठवतात त्यावेळेला एक माणुसकीचा आदर्श प्रत्येकाच्या मनामनात जागृत होतो आणि अशाच पद्धतीने हा आदर्श व मराठा समाजावर आणि युवा आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय हा खऱ्या अर्थाने खूप दयनीय असून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ही अगदी जीवाची पर्वा न करणारं आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि आमच्या थोरल्या भावाला आरक्षण मिळाले पाहिजे. अशा पद्धतीच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भास्कर, युवक करवीर अध्यक्ष सुभाष कांबळे, करवीर संघटक नामदेव कोथळीकर, आप्पासो मोरे, कागल कार्याध्यक्ष सचिन मोहिते, जयश्री कांबळे, शुभम कांबळे, बाबासो निगवेकर, समाधान बेलेकर, संग्राम गर्जनकर आदींसहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.