कोल्हापूर : छगन भुजबळ यांनी जालना येथील शुक्रवारी झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यांवर माजी खासदार संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडले असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसापासून राज्यात वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौराही सुरु केला आहे. अशातच ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी जालना येथील ओबीसी एल्गार सभेत जरांगे यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
दगडाला शेंदरू लावून हा कुठला तुमचा देव झाला?
आम्हाला घटनेने, संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? आम्ही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाहीत, दगडाला शेंदरू लावून हा कुठला तुमचा देव झाला? अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांचे नाव न घेता ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी जालना येथील ओबीसी एल्गार सभेत केली.