कोल्हापूर – ते वेगळेच स्वप्न बघायलेत, मला तर आता असं कळालंय, मला माहिती नाही. पण, मला कळालंय. मी या व्यासपीठावरुन खोटं बोलणार नाही. ते म्हणालेत मला मुख्यमंत्री व्हायचयं, मग अजित दादांना कुठं पाठवतो, आणि देवेंद्र फडणवीसांचं.
म्हणजे सगळ्यांना सोडून तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायचयं. मग तर आमचा विषयचं संपला. आम्हाला आरक्षणच मिळणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी कोल्हापूरच्या शाहुनगरीतून भुजबळांवर जोरदार पलटवार केला. यावेळी, व्यासपीठावर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहु महाराज आणि माजी खासदार संभाजीराजे हेही उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांनी जालन्यातील आरक्षण बचाव एल्गार सभेत मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे उपोषण आणि दौ-यांची थट्टा उडवताना पोलिस आणि ओबीसी नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल अप्रत्यक्षरित्या जरांगे-पाटील यांना जबाबदार धरले. त्यानंतर, जरांगे यांना शाहुनगरीत दोन्ही राजेंच्या उपस्थितीत छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला.
वयाच्या मानाने ते आज काहीही बरळले, मी सासऱ्याच्या घरचं खातो, असेही म्हटले. पण, तू तर आमचं खातो, आम्हा गरीब जनतेचं रक्त पिऊन तुम्ही मोठे झालात.
त्यांना राज्यात अशांतता पसरवायची आहे, त्यांना गोंधळ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांना रोखावं, नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला. यावेळी, दोन्ही राजेंनी टाळ्या वाजवून दाद दिली.
म्हणूनच तुरुंगात जाऊन बेसन भाकरी खाल्ली
‘व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. मात्र, एवढ्या मोठ्या माणसाने आज पातळी सोडली. आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती.
आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? तुम्ही गोचिडासारखे आमच्या जनतेचे रक्त शोषूण करोडोची संपत्ती कमवली. म्हणूनच तुम्हाला जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली. गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला स्वस्थ घरात बसू देत नव्हता. त्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे.’
त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे…
मंत्री भुजबळ यांना मुख्यमंत्री बनण्याचे डोहाळे लागल्याचा गौप्यस्फोट जरांगे-पाटील यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. तीच इच्छा त्यांच्या ओठावर आली. पण, ते खुप अवघड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काय होणार? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.