मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन

0
85

सांगली : मराठा समाजाची स्थिती सुधारत प्रगती साधण्यासाठी आरक्षणाची मागणी करीत आहोत. मराठा समाजाला कोणाच्या वाट्याचे नव्हे, तर हक्काचे आरक्षण पाहिजे आहे. मराठा हाच कुणबी आहे याचे पुरावे आता समोर येत आहेत.

परंतु, गेल्या ७० वर्षांपासून हक्काच्या आरक्षणापासून समाजाला दूर ठेवण्यात आले. आताही आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजाला अडविण्यासाठी षडयंत्र सुरू असून, समाजाला पडलेला हा वेढा मोडून काढा, असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शुक्रवारी मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली. भर उन्हात या सभेस जिल्हाभरातून मराठा बांधव उपस्थित होते.

जरांगे-पाटील म्हणाले की, आजवर मराठा समाजाच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. किमान पुढच्या पिढीला तरी लाभ व्हावा यासाठी आरक्षणाचा लढा तीव्र करीत आहोत. सरकारसोबत आर या पारची लढाई सुरू केली आहे.

आजवर मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समित्या आणि आयोगांनी पुरावे नाहीत या एकाच कारणावरून आरक्षण नाकारले. आता तर पुरावे सापडू लागले आहेत.

शेती हा मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीलाच पूर्वी कुणबी म्हटले जात होते. याचेही पुरावे आता मिळू लागल्याने याला विरोध करणाऱ्या टोळ्या समोर येत आहेत. याला जर बळी पडलो तर आरक्षण मिळणार नाहीच; शिवाय उद्या संपूर्ण मराठा समाज संपवायलाही ते कमी करणार नाहीत.

मला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आपण मराठा समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही.

सरकारने केलेल्या प्रथम अहवालात कुणबी हेच मराठा असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे आजवर मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून दूर ठेवण्यात आले आहे. आता तर पुरावे असतानाही सरकारवर दबाव टाकून ओबीसीचे आरक्षण मराठ्यांना मिळू नये यासाठी काही जण षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उद्याच्या सावलीसाठी आता उन्हात या

दुपारी पावणे तीनच्या सुमारास जरांगे-पाटील सभेच्या ठिकाणी आले. यावेळी भर उन्हातही अनेक जण समोर बसून होते तर बहुतांश मराठा बांधव सावलीत बसले होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच पुढच्या पिढ्या सावलीत बसाव्यात असे वाटत असेल तर आता तुम्ही उन्हात बसा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी करताच सर्व जण समोर येऊन बसले.

१ डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण

जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने २४ डिसेंबरपासून सरसकट आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घेतले व सहकार्याची भूमिका घेतली.

तरीही आता मराठा समाज शांत आहे असे सरकारला वाटायला नको. यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवा. १ डिसेंबरपासून जिल्ह्यात ‘गाव तिथे साखळी उपोषण’ सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आधी पोरांचे भले करा; मग, पक्षांचे झेंडे हाती घ्या!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाने एकजूट कमी करता कामा नये. आरक्षणाचा प्रश्न टप्प्यात आल्याने अगोदर आपल्या भावी पिढीचे भले करा आणि मग तुम्हाला हव्या त्या पक्षाचे झेंडे हाती घ्या, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here