सणासुदीला वाहन खरेदी केल्यावर त्यासाठी क्रमांकही आपल्या पसंतीचा हवा, यासाठी वाहनचालकांचा आग्रह असतो. घरबसल्या पसंतीचा वाहनक्रमांक आरक्षित करता यावा, यासाठी परिवहन आयुक्तालयाने प्रस्ताव तयार केला आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याच्या त्रासातून वाहनधारकांची कायमची सुटका होणार आहे.
वाढदिवसाची तारीख, लग्नाची तारीख, भाग्यांक, जन्मांक असे अंक दैनंदिन वापरात आणण्यासाठी सर्वसामान्यांचा आग्रह असतो. लाखो रपयांचे वाहन खरेदी केल्यानंतर त्याचा क्रमांक मनासारखा मिळवण्यासाठी वाहनचालक आरटीओमध्ये चकरा मारतात.
आरटीओबाहेरील दलाल वाहनचलकांना हेरुन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळतात.
थेट नव्या वाहनाचा ताबा
– वाहन क्रमांकाची मालिका आणि परिवहन संकेतस्थळाचे सॉफ्टवेअर यांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.
– परिवहनच्या संकेतस्थळाला पेमेंट गेटवे जोडण्यात येईल.
यामुळे सर्व ऑनलाइन पर्यायांमधून वाहनचालकांना शुल्क भरुन क्रमांक घेता येईल. यामुळे प्रवाशांना आरटीओमध्ये न येता वाहन विक्रेत्यांसह डिलरकडून वाहनाला नंबर प्लेट बसवूनच नव्या वाहनाचा ताबा मिळवता येईल.
– हा प्रस्ताव तयार असून परिवहन आयुक्तांच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असे परिवहन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
१. नवे वाहन घेतल्यावर त्याला तात्पुरता वाहन क्रमांक देण्यात येतो. कायमस्वरुपी क्रमांकासाठीची प्रक्रिया आरटीओमध्ये पूर्ण होते. पसंतीचा वाहन क्रमांक ऑनलाइन उपबल्ध आहे.
२. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरटीओमध्ये यावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने चालक दलालांकडे जातात.
>> या दलालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवडीचा वाहनक्रमांक ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे शुल्कही वाहनधारकांना संकेतस्थळावर भरता येणार आहे.
>> वाहनधारकांच्या सुविधेसाठी आरटीओतील लर्निंग लायसन्सवरील पत्ता बदलणे, जन्मतारीख बदलणे, जन्मतारीख बदलणे, लायसन्स हरवल्यास दुय्यम प्रत काढणे, वाहन हस्तांतरीत करणे, गहाळ झालेल्या आरसीची दुय्यम प्रत काढणे यांसह आरटीओतील पन्नासहून अधिक सेवा वाहनचालकांना ऑनलाइन उपलब्ध आहेत.
गाडीसह क्रमांकही शोरुममध्ये
वाहन विक्रेते आणि डिलरला वाहन नोंदणी करण्याची मुभा परिवहन विभागाने दिली आहे. आवडीचा वाहन क्रमांक ऑनलाइन आरक्षण केल्यानंतर तात्पुरत्या वाहन क्रमांकाची गरज भासणार नाही. यामुळे प्रवाशांना एकाच वेळी वाहन खरेदीची क्रमांकासह प्रक्रिया पूर्ण करता येईल.