Kolhapur: परीक्षेत कुणाचीच नाही कदर, पकडले ६९२ कॉपीबहाद्दर; तीन परीक्षा केंद्रे केली रद्द

0
65

कोल्हापूर : एकीकडे दहावी-बारावीपासून ते पदवीपर्यंतची अनेक शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना हमखास ‘पास’ करून देणारी केंद्रे म्हणून ओळखली जात असताना दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी.च्या हिवाळी परीक्षांमध्येही बैठे व भरारी पथकाच्या माध्यमातून कॉपीमुक्त अभियान व पारदर्शक परीक्षेला बळ दिले आहे.

यामुळे हिवाळी परीक्षेमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात १० नोव्हेंबरअखेर ६९२ विद्यार्थी काॅपी करताना आढळले आहेत. तर परीक्षा नियमांचे उल्लंघन, गोपनीयतेचा भंग केल्याने तीन परीक्षा केंद्रे रद्द केली आहेत.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांना २० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी.च्या तृतीय वर्षातील परीक्षा शिवाजी विद्यापीठामार्फत घेतल्या गेल्या. या परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने भरारी व बैठ्या पथकांमध्ये वाढ केली.

काय होते कारवाई

एखादा विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर पहिल्या उत्तरपत्रिकेवर कॉपीचा शेरा मारून दुसरी उत्तरपत्रिका दिली जाते. पर्यवेक्षक, भरारी व बैठे पथक यांच्याकडून त्याची तपासणी केली जाते. त्याच्याकडून कॉपी केल्याची कबुली देणारा फॉर्म भरून घेतला जातो. त्याची उत्तरपत्रिका, फॉर्म पर्यवेक्षकांच्या सहीने एकत्रित अर्ज सील करून तो परीक्षा प्रमाद समितीकडे येतो. कॉपीची तीव्रता पाहून त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते.

पथकाची घेतली जाते बैठक

परीक्षा सुरू होण्याआधी भरारी व बैठे पथक सदस्यांची बैठक घेतली जाते. यात काॅपीमुक्तीची रणनीती ठरविली जाते. सदस्यांचा परीक्षेचा कार्यकाळ पूर्ण झाला की त्यांच्या अनुभवाने कोणत्या केंद्रावर भरारी व बैठे पथक ठेवण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन परीक्षा विभाग त्यानुसार नियोजन करते.

स्वत: परीक्षा संचालक देतात केंद्रांना भेटी

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव हे स्वत: कार्यक्षेत्रातील बहुतांश परीक्षा केंद्रांना भेटी देत आहेत. यातून कोणत्या केंद्रावर परीक्षेतील गोपनीयतेचा भंग होतो याची माहिती त्यांना कळते.

त्यामुळे पुढल्यावेळी संबंधित केंद्रावर बैठे पथक ठेवून त्या केंद्रावर कॉपी होणार नाही, याची दक्षता ते घेत आहेत. या भेटीमुळे कॉपीला आळा बसण्यास मदत होत आहे.

परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, यासाठी भरारी पथकात वाढ केली आहे. केंद्रांवर बैठे पथकही ठेवले आहे. सर्वच परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त झाली पाहिजेत हा प्रयत्न आहे. – डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ. शिवाजी विद्यापीठ

जिल्हानिहाय कॉपी केसेस

  • कोल्हापूर : २६१
  • सांगली : ११३
  • सातारा : २६८

दृष्टिक्षेपात परीक्षा
हिवाळी सत्र परीक्षा : ७००
एकूण विद्यार्थी : २ लाख ३० हजार

असे आहे भरारी पथक
बैठे पथक : २७
भरारी पथक : ९, प्रत्येक पथकात तीन सदस्य-मिळून २७ सदस्य
स्पेशल भरारी पथक : २७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here