कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मनोज जरांगे-पाटील यांची झालेली सभा पक्षविरहित होती. या सभा महाराष्ट्रभर जरांगे यांच्या बॅनरखाली घेतल्या जातात, हे सुजित चव्हाण यांना माहीत नाही का?
एक सत्ताधारी पक्षाचे प्रमुख या नात्याने आपण काढलेली प्रेसनोट ही आपली नसून, आपला बोलविता धनी कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी सोमवारी उपस्थित केला.
जरांगे पाटील यांच्या सभेत राष्ट्रवादीशी संबंधित शाहू छत्रपती व स्वराज संघटनेचे संस्थापक संभाजीराजे हे उपस्थित कसे, असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी विचारला होता. त्याला पाटील यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले.
पत्रात म्हंटले आहे की, जरांगे -पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ही सर्व मंडळी लोकसमुदायात बसली होती. त्यावेळी आपण घरी बसला होता हेच का तुमचे मराठा समाजावरचे प्रेम. यदा कदाचित पक्षाच्या सूचनेवरूनच आपण आला नसाल.
छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही पक्षाचे सभासद नाहीत. ते पुरोगामी विचाराचे पाईक आहेत. जरांगे पाटील यांनीच शाहू महाराजांना सभेसाठी निमंत्रित केले होते. संभाजीराजें सभेत लोकसमुदायासोबत बसले असताना जरांगे -पाटील यांनी त्यांना व्यासपीठावर यावे, अन्यथा मला खाली यावे लागेल, असे सांगितले.
या घटना तुम्हाला घरात बसून कशा कळतील, असा टोमणाही पाटील यांनी चव्हाण यांना लगावला. मनोज जरांगे पाटील हा मराठा समाजाला मिळालेला स्वच्छ आणि प्रामाणिक चेहरा आहे. उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी उभा आहे. आपणही त्यांच्या पाठीशी उभे राहा, असा सल्लाही पाटील यांनी दिला