सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू

0
61

सांगली : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा सप्ताह म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त उपक्रमही राबवत अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जाते.

तरीही रस्त्यांचा वाढलेला दर्जा आणि त्यामुळे अपघातांचीही संख्या वाढतच असल्याने अपघातांची संख्या कमी होईल यावर काम करण्याची गरज आहे. आठवडाभर केवळ प्रबोधन करून अपघात कमी होणार नाहीत तर त्यासाठी ठोस कृतीचीच आवश्यकता आहे.

नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात हे उपक्रम होतात. यंदा शुक्रवारपर्यंत हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, वाहतूक नियमांचे प्रबोधन, प्रचार आणि रस्ता सुरक्षेसाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यानंतर सर्वाधिक आवश्यकता असलेली वैद्यकीय मदत, पोलिसांचे सहकार्य, परिसरातील सामाजिक संघटनांचा पुढाकार व सर्वांना एकत्रित आणत सन्मान करण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम होतच असतात.

अपघात टाळण्यासाठी उपाय काय?

अपघात होणारच नाहीत अशी आदर्श नियमावली असली तरी त्याचा अवलंब शक्यही नाही. त्यामुळे किमान अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. यात वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य स्थिती, पात्र व्यक्तीलाच वाहतूक परवाना देणे, त्या त्या भागातील अपघात क्षेत्र निश्चित करून त्यावर उपाययोजना केल्यास निश्चितच अपघात टाळण्यास मदतच होणार आहे.

केवळ ‘इव्हेंट’ नसावा, प्रामाणिक प्रयत्न हवेत

दरवर्षी अपघाताविषयी प्रबोधनासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. याशिवाय नोव्हेंबरमध्येही अपघातग्रस्तांना मदत, वाहतूक नियमांचे प्रसार, प्रचार आणि प्रबोधनावर भर दिला जातो. तरीही वर्षभर यात सातत्य दिसून येत नाही. त्यामुळेच हा केवळ ‘इव्हेंट’ न होता अपघात टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

जिल्ह्यात दिवसाला दोन अपघात

जिल्ह्यात वर्षभरातील अपघातांचा आढावा घेतला तर सातशेवर अपघातांची नोंद होते. त्यानुसार दिवसाला दोन अपघात होतातच. यात मृतांची संख्याही २७५ ते ३०० च्या दरम्यान असते. गेल्या तीन वर्षांपासून यातील संख्या वाढतच चालल्याने अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यताच दिसून आली नाही.

गेल्या दहा महिन्यांतील अपघातांची संख्या

  • एकूण अपघात ५०५
  • अपघातात मृत्यू २२५
  • अपघातात गंभीर जखमी ४१३
  • अपघातात किरकोळ जखमी ३६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here