अडीच वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

0
126

(बुलढाणा): अडीच वर्षीय चिमुकलीला १७ वर्षीय नराधमाने खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर पडक्या घरात अत्याचार केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून नराधमावर बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात समाजमन सुन्न करणारी ही घटना घडली आहे. कायद्याच्या दृष्टीने विधिसंघर्षग्रस्त असलेल्या १७ वर्षीय नराधमाने बालिकेला वासनेची शिकार बनविले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून नराधमाने तिला उचलले. त्या चिमुकलीचा तो नेहमी लाड करीत असल्याने त्याच्यावर कुणाला संशय आला नाही.

मात्र, दीड तास होऊनही मुलगी घरी आली नाही, त्यामुळे तिची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतरही मुलगी सापडली नाही. शेवटी गावातील एका जुन्या पडक्या घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला.

तिच्या नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. डोक्याला व शरीराला ठिकठिकाणी मार लागला आहे. शरीरातून रक्तस्राव होत असल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचे आढळून आले.

मुलीला तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तातडीने आरोपी नराधमाला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here