“मला त्या मंदिरात…”, मजुरांच्या सुटकेसाठी आलेले तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स यांचं वक्तव्य; म्हणाले, “हा चमत्कार…”.

0
77

29 नोव्हेंबर 2023 उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

बचाव पथकांनी मंगळवारी या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढलं. विविध यंत्रणांचा सहभाग असलेल्या या बचावकार्याची रात्री आठच्या सुमारास सांगता झाली. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करून मजुरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले.

मजुरांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणांना तब्बल ६० मीटरपर्यंत खोदकाम करावं लागलं. या खोदकामासाठी अमेरिकहून ऑगर मशीन मागवण्यात आली. तसेच दिल्लीतले तज्ज्ञ बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाहून बोगद्याच्या कामातले तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स यांनादेखील बोलावलं होतं.

मजुरांची सुखरूप सुटका झाल्यानंतर अर्नॉल्ड डिक्स यांचंही कौतुक होत आहे. कारण, मजुरांना बाहेर काढण्यात डिक्स यांचंदेखील योगदान आहे. मजुरांची सुटका झाल्यानंतर डिक्स यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मला बोगद्याच्या बाहेर असलेल्या मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील. मजुरांची सुखरूप सुटका होणं हा एक चमत्कारच आहे.अर्नॉल्ड डिक्स यांनी बुधवारी सकाळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली.

यावेळी ते म्हणाले, तुम्हाला आठवतंय का, मी तुम्हाला म्हटलं होतं की हे मजूर नाताळपर्यंत बाहेर येतील. कोणालाही कसलीही दुखापत होणार नाही. नाताळ जवळ येतोय. आम्ही बचावाचं काम करताना शांत होतो.

पुढची वाटचाल कशा पद्धतीने करायची याबद्दल आम्ही स्पष्ट होतो. एक टीम म्हणून आम्ही उत्तम काम केलं. भारतात जगातले उत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा मी एक भाग होतो याचा मला आनंद आहे.


सिलक्यारा बोगद्याबाहेर एक छोटंसं मंदिर आहे. अर्नॉल्ड डिक्स मंगळवारी या मंदिरासमोर बसून प्रार्थना करताना दिसले. रात्री मजूर सुखरूप बाहेर आले. आज (बुधवारी) ते म्हणाले, मला आता त्या मंदिरात जावं लागेल. कारण जे काही घडलं त्याचे आभार मानण्याचं मी वचन दिलं आहे. आपण नुकताच एक मोठा चमत्कार पाहिला आहे.कोण आहेत अर्नॉल्ड डिक्स?


अर्नॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे (जिनेव्हा) अध्यक्ष आहेत. तसंच त्यांच्याकडे भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंता आणि वकील यांसारख्या इतर पदव्याही आहेत.

अर्नॉल्ड डिक्स यांनी मेलबर्न येथील मोनाश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याची पदवी मिळवली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीवरून ते कुशल वकील असल्याचंही सांगितलं जातंय. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत डिक्स २० हे नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here