बिद्रीच्या फडात कोण लै भारी ठरणार अन् कोणाचा कंडका पडणार? निकालाची उत्सुकता शिगेला!

0
181

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अगदी घराघरात चर्चेचा विषय झालेल्या कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल उद्या 5 (डिसेंबर) जाहीर होतआहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या ५ (डिसेंबर )रोजी कोल्हापुर शहरातील मुस्कान लाॅनला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी ची तयारी सुरू झाली असून एकूण १२० टेबलवर मतमोजणी होणार आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी ४९९४० इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ५ लाख मतपत्रिका मतदान अधिकारी हताळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी आज दिली.सत्ताधारी गटाचे चिन्ह विमान व विरोधी गटाचे चिन्ह कप बशी आहे. दरम्यान, बिद्री साखर कारखान्यासाठी रविवारी ८९.३ टक्के मतदान झालं. ५६०९१ मतदारांपैकी ४९९४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७३ मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. दोन्ही आघाडीचे ५० उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन व अपक्ष चार अशा ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना या निवडणुकीसाठी रंगला आहे. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार? आणि कोणाचा कंडका पडणार? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. या निवडणुकीसाठी कधी नव्हे ती चुरस यावेळी निर्माण झाली आहे. रविवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. एक एक मतासाठी नेते घरोघरी फिरताना दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी निश्चितच नसेल हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी तब्बल सात साखर सम्राट प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.

बिद्रीच्या फडात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. त्याचबरोबर राजकीय चिखलपेक सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे निवडणूक वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांचे मेहुणे फुटून विरोधी आघाडीत सामील झाल्याने चुरस आणखी वाढली आहे.
विधानसभेची रंगीत तालीम
दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पूर्णतः विधानसभेची रंगीत तालीम एक प्रकारे पार पडली आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर अशा चार तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे विधानसभेची पेरणी करण्यासाठी सर्वच नेत्यांकडून मोठी ताकद पणाला लावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here