कोल्हापूर : ग्रेड पे वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा घेऊन शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदारांचे केबिन रिकामी होते.
तसेच सदर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले.
नायब तहसीलदारांचे ग्रेड पे ४ हजार ८०० रुपये वाढवून मिळावे या मागणीसाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा घेतली. यापुढेही वेगवेगळ्या टप्प्यावर आंदाेलन केले जाणार असून, दि.२८ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले. यावेळी संजय शिंदे, मदन जोगदंड, दिगंबर सानप, मनीषा माने, संजय मधाळे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील संघटनेचे प्रमुख नायब तहसीलदार उपस्थित होते.