कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी होणार असून या समारंभाला यंदा राज्यपाल तथा कुलपती डॉ. रमेश बैस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस.
मंथा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी बुधवारी येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते, परंतु यावेळी ते येउ शकले नव्हते. दरम्यान, या सोहळ्यात ४९,४३८ पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
डॉ. शंकर मंथा यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत शैक्षणिक व नागरी प्रशासन क्षेत्रातील अनेक सन्मानाची पदे भूषविली आहेत. मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. संस्थेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व कंट्रोल थिअरी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे.
त्याखेरीज, आय.बी.एम., पॉकिप्सी (न्यूयॉर्क) या अमेरिकन कंपन्यांमध्येही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून त्यांचे २८० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या नावावर तीन पुस्तकेही आहेत. ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ (एनएसक्यूएफ) आणि ‘ब्लेंडेड लर्निंग’ नियमावलीचे ते उद्गाते आहेत. याशिवाय कर्नाटक स्कील डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे सदस्य आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागारही ते आहेत.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि के.एल. विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड स्टडीज्, बेंगलोर या संस्थेत ॲडजंक्ट प्राध्यापक, नॅशनल सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी स्टॅंडर्ड्स (एनसीएसएसएस) संस्थेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन आणि महाराष्ट्र शासनासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून काम पाहात आहेत.
यंदा पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींची सख्या लक्षणीय दरम्यान, या समारंभात ४९,४३८ पदव्या प्रदान करण्यात येणार असून यंदा पदवी ग्रहण करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे अशीही माहिती कुलगुरु डॉ. शिर्के यांनी दिली.गतवर्षीही पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.