राजकीय विरोध विसरून शरद पवार यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

0
95

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

देशातील राजकारणात महत्वाचं स्थान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ शरद पवार याचा आज वाढदिवस संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांना त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मोदींनी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
“श्री शरद पवार जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
शरद पवार हे देशातील अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केले आहे आणि राजकीय शत्रुत्व असूनही पक्षपातळीवरील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी शरद पवार ओळखले जातात.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असून संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री होते.काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांनी, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकारिणीत बंडखोरी केली आणि त्यामुळे पक्षात फूट पडली. महाराष्ट्र, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळाली. मात्र, या वर्षी पक्षाला हा दर्जा गमवावा लागला आहे.
शरद पवार हे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एकं मोठं नाव आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज राज्यात शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here