नाशिकच्या रामेश्वर नगरात बिबट्या आला अन् फेरफटका लागवून गेला;सीसीटीव्हीत कैद

0
58

नाशिक : गंगापुररोडवरील पाइपलाइन रोड, रामेश्वरनगर भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचा ‘कॉल’ वनविभागाला गंगापुर पोलिसांकडून मिळाला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता एका सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाल्याचे दिसून आले.

यामुळे सर्व लवाजम्यासह वनाधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (दि.१३) सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या संपुर्ण भागात बिबट्याचा शोध घेण्यात आला; मात्र कुठेही बिबट्या आढळून आला नाही.

वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला बिबट्या गंगापुररोडभागातील लोकवस्तीत दिसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनपाल उत्तम पाटील, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, विजय पाटील, दिपक जगताप, सचिन आहेर, रोहिणी पाटील, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आदींचे पथक सज्ज करून घटनास्थळी पाठविण्यात आले. गंगापुररोडवरील आनंदवलीच्या पुढे रामेश्वरनगर, पाइपलाइन रोडवरील विविध भागात दाेन वनपथकांनी शोध मोहीम राबविली. रामेश्वरनगरमधील उद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडीझुडुपाजवळ फटाके वाजविण्यात आले.

जेणेकरून दडलेला बिबट्या बाहेर पडेल; मात्र तेथेही बिबट्या आढळून आला नाही. पाइपलाइन रोडवरील एका बंद पडलेल्या लॉन्समध्ये पाठीमागील बाजूस वाढलेल्या झाडीझुडुपात वनपथकाकडून शोधमोहिम घेण्यात आली.

याठिकाणी एका भटक्या श्वानाचा फडशा पाडल्याचा पुरावा वनखात्याला मिळाला. तसेच रामेश्वरनगरातील केशर बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बचाव पथक सज्ज अन् अलर्ट!
वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वन्यजीव बचाव पथक लवाजम्यासह सज्ज आहे. रात्रीचे गस्तीपथकालाही ‘अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गायकवाड यांनी दिली.

नागरिकांनी अफवा पसरवू नये. बिबट्या जर खरोखर बघितला तरच त्याची माहिती कळवावी. कुठल्याही ऐकीव माहितीवरू विश्वास ठेवून सोशलमिडियावर मॅसेजेस किंवा जुने व्हिडिओ, फोटो व्हायरल करु नये, असे आवाहन गाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here