दादांच्या भूमिकेवर मुश्रीफांचे पालकमंत्रिपद अवलंबून!, कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता

0
76

चंद्रकांत पाटील गेल्या विधानसभेला पुण्यातून कोथरूडमधून विजयी झाले. परंतु त्यावेळी महाविकास आघाडीसोबत असलले अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाले. ज्याचे जिल्ह्यात आमदार जास्त त्याचा पालकमंत्री, असे सूत्र ठरल्याने सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री बनले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा हिरमोड झाला. त्यांच्यावर अहमदनगरची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु त्यांनी त्या पदात फारसा रस दाखवला नाही. ‘सतेज पाटील यांनी मोठं मन दाखवायला पाहिजे’ अशी खंत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती.

आता परिस्थिती एकदमच बदलली आहे. अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत बैठकांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील बाजूलाच पडल्याचे दिसत आहे. शिवाय पुण्याच्या प्रशासनावर कायमच पवार यांचा दबदबा राहिला आहे. मंत्री पाटील यांनी पालकमंत्री असताना गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अनेक योजनांना कात्री लावली होती. या पार्श्वभूमीवर आता पवार उपमुख्यमंत्रिपदावरूनच कारभार हाकणार की थेट पालकमंत्रिपदाची मागणी करणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यांचा हा होमटाऊन जिल्हा आहे. त्यांना त्या जिल्ह्यातून किती राजकीय बळ मिळते याबद्दलही उत्सुकता आहे.

पालकमंत्रिपदाचा वापर करून राजकीय मांड निर्माण करता येत असल्याने ते ही जबाबदारी मागून घेण्याची शक्यता जास्त आहे. आता राज्य सरकारमध्ये असलेल्या अजित पवार यांना पंतप्रधान व अमित शाह यांच्याशी थेट ॲक्सेस आहे. त्यामुळे त्यांनी पालकमंत्रिपद हवे म्हटल्यास त्यास विरोध करण्याची ताकद आताच्या भाजपमध्ये राहिलेली नाही.

जर अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री घेतले तर मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांनाच द्यावे, यासाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत. मुश्रीफ जरी बरोबर सत्तेत आले असले तरी त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळू नये यासाठीही एक मोठा गट कार्यरत झाला आहे. पण यासंबंधीचा निर्णयही पवार यांच्या शब्दावरच ठरणार आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्यासाठी ताकद लावली तर हे पद पदरात पाडून घेणे अशक्य नाही..

अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातूनच जर पुणे जिल्ह्यावर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला तरच चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री राहतील आणि मुश्रीफ यांना कोल्हापूरची संधी मिळू शकते. त्यामुळेच मुश्रीफ यांचे हे स्वप्न अजित पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

आजपर्यंत कोल्हापूरचे पालकमंत्रिपद भूषविण्याची संधी चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील या दोन भूमिपुत्रांनाच मिळाली आहे. आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांना संधी मिळणार की कोल्हापूरचे तिसरे भूमीपुत्र, श्रावणबाळ हसन मुश्रीफ यांना संधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here