Kolhapur: राजर्षींच्या शिल्पांना शासकीय अनास्थेचे ‘तडे’; शिल्पांचे टवले उडाले, बुरशी अन् धूळमातीचा थर

0
115

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे लोकाश्रयातून स्थापन झालेल्या व कोल्हापूरच्या पुराेगामी, सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनचा विकास निधीअभावी रखडला आहे.

प्रवेशद्वारासमोरील शाहूराजांच्या शिल्पांची शब्दश: दुर्दशा झाली आहे, शिल्पांचे टवके उडाले आहेत, बुरशीसदृश थर तयार झाला आहे. बोटभर माती – धूळ साचली आहे, ही शिल्पे बघवत नाहीत, अशी अवस्था आहे.

एकीकडे कोट्यवधींची उड्डाणे घेत शहर विकासाची कामे केली जात आहेत, पर्यटनस्थळांसाठी विशेष तरतूद केली जात आहे, आमदार, खासदारांना कोट्यवधींचा फंड मिळतो तिथे या वास्तूसाठी निधी मिळत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे.

दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू ममोरिअल ट्रस्ट म्हणजेच शाहू स्मारक भवनशी कोल्हापूरकरांची नाळ जुळली आहे. शाहू महाराजांच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी पै पै जमा करून ही वास्तू उभारली गेली.

सन २०१३च्या दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने वास्तूचे नूतनीकरण झाले. नवी दालने निर्माण झाली, मिनी हॉल तयार झाला, देखणी वास्तू तयार झाली. मात्र, देशमुख यांच्यानंतर शाहू स्मारकाच्या कामकाजात अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष घातले नाही.

तेथील गैरकारभार लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. महसूलमधील निवृत्त कर्मचारी दत्तात्रय नांगरे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली.

त्यांनी आल्यापासून काही सुधारणा केल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा नाहीत. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले, आताही अनेक सोयीसुविधा केल्या जात आहेत. पण शाहू स्मारकाच्या नशिबी निधीची वाट पाहणेच आहे. (पूर्वाध)

..हे दिसत नाही का?

शाहू महाराजांचे कार्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या शिल्पात कोरले आहे. या शिल्पांवर बोटभर धूळमाती साचली आहे. जाळी व जळमटे लागली आहेत. अनेक शिल्पांवरील रंग उडून पांढरी झाली आहेत. काही शिल्पांवर बुरशीजन्य मातीची जाळी लागली आहे. काही शिल्पांवर पांढरा थर तयार झाला आहे. भवनच्या व्यवस्थापनाला, कर्मचाऱ्यांना ही अवस्था दिसत नाही का?

झालेली कामे

  • उत्तम स्वच्छतागृह
  • रंगकाम, तुटलेल्या फरशांची दुरुस्ती
  • ७० खुर्च्या बदलल्या

गेस्ट हाऊस १० वर्षांपासून बंद

ट्रस्टचे गेस्ट हाऊस १० वर्षांपासून बंद आहे, तेथील गळती काढून नूतनीकरण केले व कुणाला चालवायला दिले किंवा ट्रस्टने स्वत: चालवले तरी चांगले उत्पन्न मिळेल. पण, इथेही निधीचा प्रश्न येतो, मागील तीन दुकानगाळ्यांचा विषयही न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. आता तो निकाली लागला असून, नवे भाडेकरार झाल्याचे समजले.

महिन्याला ३ लाखांचे उत्पन्न

ट्रस्टला महिन्याला जवळपास ३ लाखांचे उत्पन्न मिळते, ११ कर्मचारी आहेत. त्यांना कोणतीही आर्थिक सुरक्षितता नाही, ८० जी सवलत नाही, बुकिंगच्या बाबतीत अजूनही नागरिकांच्या तक्रारी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here