कोल्हापूर : नाताळची गाणी गात तरुण, तरुणीचे गट घरोघरी भेट देत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातील ख्रिस्ती बांधवांच्या वसाहतीमध्ये तसेच घराघरातील वातावरण नाताळमय झाले आहे.
ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटी करण्यात आल्या आहेत. नाताळच्या तयारीला शहर आणि जिल्ह्यात वेग आला आहे.
ख्रिस्ती समाजातील मोठा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते. हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे ख्रिस्ती घरांमध्ये नाताळच्या तयारी अंतिम टप्प्यात आहे.
घरोघरी केक, डोनट आणि विविध गोड पदार्थ बनविण्यामध्ये महिला व्यस्त आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कॅरोल सिंगिंगचीही धूम शहरात सुरू आहे. तरुण-तरुणींचे गट ख्रिस्ती कुटूंबाला भेट देऊन गाणी गात आहेत. त्यांच्या रात्रभर कॅरोल सिंगिंगमुळे शहरातील वातावरण नाताळमय झाले आहे.
बाजारपेठेतही नाताळची खरेदी जोरात सुरू आहे. विविध बेकरी, हॉटेल्समध्ये सांताक्लॉजचे मुखवटे आणि ख्रिसमस ट्री लावून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. बेकरीमध्येही केक, डोनटसह इतर पदार्थांना मागणी वाढली आहे.
शहरातील वायल्डर मेमोरिअल चर्च, ख्राइस्ट चर्च, सेव्हंथ डे चर्च, ऑल सेंटस चर्च, होली इव्हॅजलिस्ट चर्च, ब्रह्मपुरी, विक्रमनगर येथील ख्रिस्ती समाजाच्या चर्चसह सर्वच लहान- मोठ्या चर्चमधून नाताळनिमित्त विविध प्रार्थना केल्या जात आहेत. कँडल लाइट सर्व्हिसही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी ख्रिसमसनिमित्त सकाळी आठ वाजेपासूनच सर्व चर्चमध्ये प्रार्थना तसेच गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दिवशी विविध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.