कोल्हापुरातील कळंबा तलावाची पाणीपातळी घटली, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट

0
48

कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणीपातळी पंधरा फुटांवर गेल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित.

फेब्रुवारीत दैनंदिन तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असल्याने तलाव पात्रातील शाहूकालीन विहीर उघडी पडायला सुरुवात झाली आहे.

आजमितीला तलावातून कळंबा ग्रामपंचायत दररोज एक, तर पालिका आठ एमएलडी पाणी उपसा करते़ तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत किमान दहा फूट मृत पाणीसाठा अर्थात डेड वॉटर शिल्लक ठेवावेच लागते. याचा अर्थ फक्त पाच फूट पाणीसाठ्याचाच उपसा प्रशासनास करावा लागणार. ऐन उन्हाळ्यात पुढील तीन महिने नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्याचे संबंधित प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, गाड्या, कपडे धुण्यासाठी होत असल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे़

प्रशासनाने घोटला शाहूकालीन तलावाचा गळा

पालिका मालकीच्या तलावातील पाणीउपसा करणाऱ्या कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिकेची सत्तर लाखांची पाणीपट्टी कित्येक वर्षे भरली नाही, तरी पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का. तलावाच्या वीस एकर हद्दीत अतिक्रमण करून रासायनिक शेती केली जात आहे. त्याचा तलावातील पाण्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही प्रशासन सुस्त आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे व व्यवसाय सुरू असून, कारवाई होत नाही. सात कोटींच्या सुशोभीकरणाचे संवर्धन ग्रामपंचायतीला करता आले नाही. पालिकेचा एकही कर्मचारी तलावावर देखभाल करण्यासाठी नियुक्त केला नाही, हे दुर्दैव.

थेट पाइपलाइन कार्यान्वित झाल्याने तलावातून पाणीउपसा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून, पुईखडीमधून पाणीउपसा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी, कळंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here