सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद या गावाजवळील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. विकास काळे (वय ४०, रा. पुणे-पंढरपूर रोड, साठ फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) यांचा वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.
जी. नंदीमठ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, याच प्रकरणातील फलटणचे डाॅ. संतोष निंबाळकर हेसुद्धा अद्याप फरारच आहेत.
पिंप्रद या गावाजवळील उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले. या प्रकरणानंतर वाई पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला. वाई पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फाैजदार विजय शिर्के यांनी तसेच त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
फलटण तालुक्यातील राजाळे येथील डाॅ. संतोष निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डाॅ. विकास काळे यांची नावे समोर आली. त्यानंतर डाॅ. विकास काळे यांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी डाॅ. काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच या प्रकरणातील संशयित महिलेनेही न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तिचाही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
तातडीने अटकेची कारवाई होणे गरजेचे
डाॅ. संतोष निंबाळकर आणि डाॅ. विकास काळे हे गेल्या काही महिन्यांपासून गायब आहेत. वाई पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही. हे प्रकरण गंभीर असताना केवळ ते फरार आहेत, असे पोलिसांकडून सांगितलं जातंय. कोणत्याही कोनाड्यात लपून बसलेल्या आरोपींना शोधून काढणे पोलिसांना सहज शक्य आहे. असे असताना या दोन डाॅक्टरांबाबत अटकेच्या कारवाईसाठी विलंब का केला जातोय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे..