सातारा : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे. तरीही साताऱ्यात महायुतीतून उमेदवार देतील त्याचा विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानेच २४ फेब्रुवारीला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा दौऱ्यावर येत आहेत,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार महाडिक बोलत होते. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या दौरा नियोजनासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महाडिक यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मकरंद देशपांडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार महाडिक म्हणाले, मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीत महाअधिवेशन झाले. यामध्ये भाजपने ३७० तर भाजप आघाडीने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे सातारा, हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. यासाठी आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे २४ फेब्रुवारी रोजी या तीन मतदारसंघात बैठक घेत आहेत.
केंद्रात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच जगातील पाचवी आऱ्थिक महासत्ता भारत देश झाला आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे. पंतप्रधान मोदी यांनीच देशातील २५ कोटी लोकसंख्येला दारिद्र्यातून बाहेर काढले आहे. पण, काॅंग्रेस सरकारच्या काळात घोटाळ्याचीच श्रृंखला होती. आता केंद्र शासनाने त्यांच्या कार्यकाळातील श्वेतपत्रिका काढली आहे. यावर काॅंग्रेस पक्ष काहीच बोलला नाही. याचाच अऱ्थ त्यांना हे मान्य आहे असे होते, असेही खासदार महाडिक यांनी निक्षून सांगितले.
साताऱ्यात शिवराजसिंह चौहान यांची सभा..
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे २४ फेब्रुवारीला कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते सातारा दाैऱ्यावर येणार आहेत. साताऱ्यातील गांधी मैदावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी बैठकीत नियोजन झाले आहे, अशी माहितीही खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.