कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी (दि.२४) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौहान येणार आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली.
मध्य प्रदेशमध्ये मामा या नावाने प्रसिद्ध असणारे चौहान हे मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ म्हणजे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या ते भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर साडे नऊ वाजता बिंदू चौकात चाय पे चर्चा होईल. १० वाजता महाराणा प्रताप चौकात भिंतीवर कमळ चिन्हे रेखाटन होईल. ११ वाजता महासैनिक दरबार हॉल येथे कोल्हापूर लोकसभेबाबत तर दुपारी २ वाजता रुक्मिणी हॉल, शिरोली येथे हातकणंगले लोकसभेबाबत ते मार्गदर्शन करतील.
या नियोजन बैठकीला खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, समरजित घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, संग्राम कुपेकर, अशोकराव माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.