प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
मुंबई:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे त्यांचे निधन झाले..
डॉ. मनोहर जोशी यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागण्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज २३ फेब्रुवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादरच्या स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत .काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.ज्येष्ठ नेते मनोहर जोशी ही कट्टर शिवसैनिक होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. ते १९९५ साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारली. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. त्यांनी या काळात मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवली.मनोहर जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी १४ मे १९६४ रोजी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला, त्यांना एक मुलगा उन्मेष आणि अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत. त्यांची नात शर्वरी वाघ हिने २०२१ मध्ये आलेल्या बंटी और बबली २ चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.