आंबा येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधुमक्षिका पालन कार्यशाळा आयोजित

0
247


उज्वला लाड :- आंबा प्रतिनिधी
सध्या शिक्षित व उच्चशिक्षित तरुण नोकऱ्यांच्या अभावामुळे आर्थिक विवंचनेत असतात. परंतु नोकरीच्या मागे न लागता सध्या स्वकर्तुत्वाने एखादा छोटासा उद्योग उभारून स्वावलंबी बनावे यासाठी शासन अनेक छोट्या मोठया योजना राबवत असतात , याची परिपूर्ण माहिती घेऊन त्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी केल्यास सध्याचा तरुण वर्ग स्वावलंबी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ आंबा तालुका शाहूवाडी येथे गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी मधुमक्षिका पालन उद्योग या संबंधित कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालय आंबा येथे आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी श्री. जवंजाळे साहेब यांनी मधमाशा पालन उद्योगासाठी आवश्यक बाबी, या उद्योगाचे वैशिष्ट्य व फायदे यासंदर्भात अतिशय उपयुक्त व सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.


मधमाशा पालन हा एक नाविन्यपूर्ण उद्योग आहे. अजून याविषयी माहिती सविस्तर पणे लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, परंतु हा एक अतिशय कमी खर्चात खेड्यापाड्यात करता येण्याजोगा लघुउद्योग आहे. यामधून शुद्ध मधाचे व मेणाचे उत्पादन घेता येते, मधमाशांमुळे परागीभवनास मदत होते व पिकांची वाढ होते. मधमाशांच्या विषा ला सुद्धा औषधी उत्पादनामध्ये मागणी आहे. अशाप्रकारे ग्रामीण भागात शेतकरी तरुण तसेच महिला हा उद्योग करू शकतात यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान आहे. केंद्र चालकांसाठी वीस दिवस तर मधु पालन करणाऱ्यास दहा दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि मध तसेच इतर उत्पादनांची खरेदी सुद्धा शासन हमीभावाने घेणार आहे. अशाप्रकारे प्रशिक्षणापासून कच्चा माल पुरवठा व पक्का माल विक्रीचे हमी या सर्व गोष्टी असल्यामुळे तरुणांनी याकडे वळले पाहिजे असे केंद्र चालक मोहन कदम सर गिरोली यांनी नमूद केले यासाठी आवश्यक ती मदत करण्यास आपण बांधील आहोत असे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी ग्रामसेवक सुभाष पाटील, उपसरपंच लांबोर साहेब , वनरक्षक सागर पवार , दीपक कोलते , भाई पाटील ,अनिता कांबळे , एस पी नाईन च्या आंबा प्रतिनिधी उज्वला लाड इत्यादी प्रमुख उपस्थित होते. तसेच कार्यशाळेसाठी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाप्रकारे ही कार्यशाळा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here