महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात राज्यात पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटणाऱ्या कंबर रहीम मिर्झा (वय ३७, रा. कॉलेज रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर ) आणि जफर मुक्तार शेख (वय ३३, रा.
सुभेदार वस्ती, श्रीरामपूर ) याला मिरजेतील वृद्ध डॉक्टरला लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून ५ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
मिरजेतील डॉ. रणजीतसिंग रामसिंग सुल्ह्यान (रा. छत्रपती शिवाजी रस्ता) हे दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घराजवळ असताना संशयित कंबर मिर्झा व जफर शेख यांनी पोलिस असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची साखळी फसवून काढून घेतली. त्यानंतर दोघे पसार झाले. डॉ. सुल्ह्यान यांनी महात्मा गांधी चाैक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करत असताना सोनसाखळी लंपास करून पलायन केलेले दोघे कोल्हापूरहून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी बुधवार दि. २१ रोजी अंकली कॉर्नरजवळ सापळा लावला होता. त्यावेळी दोघेजण एमएच १७ पासिंगच्या दुचाकीवरून येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली. त्यावेळी संशयित मिर्झाकडे सोन्याची साखळी आणि रोख रक्कम सापडली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही दोन दिवसांपूर्वी पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची कबुली दिली.
गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलिस कर्मचारी सागर लवटे, बिरोबा नरळे, दऱ्याप्पा बंडगर, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, अमर नरळे, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने केली.
कंबर मिर्झा आंतरराज्य गुन्हेगार
कंबर मिर्झा हा पोलिस दप्तरी गुन्हे नोंद असलेला गुन्हेगार आहे. त्याने पोलिस असल्याचे भासवून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात गुन्हे केले आहे. आंतरराज्य गुन्हेगार मिर्झाकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.