कोल्हापूर : शरीर सुदृढ बनविण्यासाठी कळंबा येथील एस फिटनेस जीम आणि एस प्रोटिन्स दुकानातून प्रतिबंधित मेफेनटेरमाईन सल्फेट या स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री सुरू होती. शरीराला घातक असणारे स्टेरॉईड विकणाऱ्या जीम ट्रेनरसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.
२२) अटक केली. ट्रेनर प्रशांत महादेव मोरे (वय ३४, रा. मोरेवाडी. ता. करवीर) आणि ओंकार अरुण भोई (वय २४, रा. आपटेनगर, कोल्हापूर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचे स्टेरॉईड जप्त केले.
शरीरावर गंभीर परिणाम करणारे स्टेरॉईड आणि अंमली पदार्थांची विक्री शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे. तात्पुरते शरीर सुदृढ बनवणे, शरीरसौष्ठव, कुस्ती, सैन्य भरती, पोलिस भरतीमधील शारीरिक चाचणीदरम्यान तरुणांकडून स्टेरॉईडच्या इंजेक्शनचा वापर केला जातो. काही ठिकाणी व्यसनांसाठीही याचा वापर होतो. याचे गंभीर धोके टाळण्यासाठी छुपी विक्री रोखून कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी माहिती काढली असता, कळंबा येथील एस फिटनेस जीम आणि एस प्रोटिन्स या दुकानातून प्रतिबंधित मेफेनटेरमाईन सल्फेट स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री होत असल्याचे समजले.
सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने जाऊन जीम आणि दुकानाची झडती घेतली. या कारवाईत स्टेरॉईड इंजेक्शनच्या बाटल्या आणि सिरिंज मिळाल्या. प्रतिबंधित स्टेरॉईडची विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याबद्दल पोलिसांनी जीम ट्रेनर प्रशांत मोरे आणि त्याचा साथीदार ओंकार भोई या दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
मोरे याने इंजेक्शन कोणाकडून आणले आणि त्याची कधीपासून विक्री सुरू होती, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाघ यांच्यासह उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार विलास किरोळकर, संजय पडवळ, दीपक घोरपडे, संजय कुंभार, अमोल कोळेकर, प्रशांत कांबळे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
३०० चे इंजेक्शन ८०० रुपयाला
अटकेतील प्रशांत मोरे हा शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. यातून त्याने स्टेरॉईड घेणे सुरू केले. पाच वर्षांपूर्वी त्याने कळंबा येथे जीम सुरू केली. झटपट परिणाम दिसावेत यासाठी तो जीममध्ये येणाऱ्या नागरिकांना ३०० रुपयांचे स्टेरॉईडचे इंजेक्शन ८०० रुपयांना विकत होता. स्वत:ला स्टेरॉईडचा त्रास सुरू असतानाही त्याने इतरांना इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती चौकशीत समोर असल्याचे पोलिसांनी सागितले.
स्टेरॉईडचे गंभीर परिणाम
स्टेरॉईडच्या डोसचे प्रमाण चुकले तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. भूक मंदावते. अस्वस्थता वाढते. हृदय आणि किडनी खराब होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय त्याची विक्री करता येत नाही, अशी माहिती डॉ. भरत मोहिते यांनी दिली.