बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप्प गावाजवळ कित्तूरकडून बिडीमार्गे लग्नसोहळ्याला जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजण ठार झाले.
गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. मृत व्यक्ती हे कित्तूर व धारवाड येथील आहेत.
कित्तूर व धारवाड येथील जमादार व लंगोटी कुटुंबातील लोक कारमधून (एमएच १२, इ एक्स ३०५२) या लग्नसोहळ्यासाठी बिडी गावाकडे निघाले होते. मंग्यानकोप्प गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली.
त्यात शाहरुख पेंढारी (३०), इकबाल जमादार (५०), सानिया लंगोटी (३७), उमर लंगोटी (१७), शबनम लंगोटी (३७), फरहान लंगोटी (१३) हे सहाजण ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले
असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून बेळगावचे एसपी भीमा शंकर गुळेद घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.