मनोहर जोशींच्या काळात रेल्वे स्टेशनला शाहूंचे नाव, क्रीडा संकुल मंजुरी; कोल्हापूरशी होते विकासाचे नाते

0
70

कोल्हापूर : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि कोल्हापूरचे विकासाचे नाते होते. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला ते लोकसभेचे सभापती असताना त्यांच्या पुढाकारातून शाहू महाराजांचे नाव देण्यात आले.

येथील विभागीय क्रीडा संकुलासही जोशी मुख्यमंत्री असतानाच मंजुरी मिळाली.

जोशी यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दिवंगत गोविंद जोशी, उद्योजक मोहन मुल्हेरकर ही यातील दोन प्रमुख नावे. त्यावेळी जोशी यांच्या पुढाकारातून भरमूअण्णा पाटील, महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक नेते मनोहर जोशींकडे जायचे आणि मग ते सर्वांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन जायचे. गारगोटी येथील भुदरगड पतसंस्थेच्या मोठ्या समारंभालाही जोशी मुख्यमंत्री असताना उपस्थित होते.

कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनची मागणी कायम ठेवून त्यावेळी शिंगणापूर टप्पा क्रमांक १ करण्याची मागणी तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांनी केली होती. त्याला जोशी यांनी मंजुरी दिली होती. या योजनेच्या भूमिपूजनाला जोशी कोल्हापुरात आले होते. भाजपचे तत्कालिन आघाडीचे कार्यकर्ते सुनील मोदी यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत डाॅ. सुब्रमण्यम आणि मनोहर जोशी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते.

कांचनताई परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली कर्तबगार महिलांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात कांचनताईंची राज्य महिला आयोगावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा जोशी यांनी केली होती.

तुला मंत्रालय लवकर समजलंय

माजी आमदार सुरेश साळोखे यांनी एक आठवण सांगितली. कामांची पत्रे घेऊन ते मुख्यमंत्री जोशी यांच्याकडे पहिल्यांदा गेले. त्यावर जोशी यांनी सह्या केल्या आणि कामे मंजूर झाली. या आनंदात साळोखे कोल्हापुरात परतले. महिन्याभराने साळोखे मंत्रालयातील कोल्हापूरच्या एका संबंधिताकडे गेले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की केवळ सही केली म्हणजे काम मंजूर नाही. तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट शेरा मारण्याची गरज आहे. मग पुन्हा साळोखे यांनी पत्रे तयार केली. साहेब नुसत्या सह्या नकोत, शेरा तेवढा मारा अशी विनंती केल्यावर वर पाहत जोशी म्हणाले, तुला मंत्रालय फारच लवकर कळलंय.

माझ्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी मनोहर जोशी आले होते. एका मराठी उद्योजकाचा कारखाना कसा असणार हे माझ्या मनात पक्के होते. परंतु हा कारखाना पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटले अशी भावना जोशी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. एका दिलदार मित्र मी गमावला आहे. – मोहन मुल्हेरकर, उद्योजक

आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व आज आम्ही गमावले आहे. कोल्हापूरचा पहिला मुस्लीम महापौर करण्यात मनोहर जोशींनी त्यावेळी पुढाकार घेतला होता. त्यांचे हे योगदान कोल्हापूरकर कधी विसरणार नाहीत. – संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना, ठाकरे गट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here