कोल्हापूर : एखादे विधान किती महागात पडू शकते, याचा अनुभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याइतका दुसरा कोणाला आला नसेल. आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या अजित पवार यांनी उजनी धरणाच्या पाण्यावरून केलेल्या विधानाचा संदर्भ देत प्रत्येक ठिकाणी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो.
आतातर चक्क त्यांच्या कधीकाळच्या स्वकियांकडूनच धरणातील पाण्यावरून त्यांना खिंडीत गाठले जात आहे.
शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला गुरूवारी निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काही मिनिटांच्या आतच सोशल मीडियावर तुतारीतून रणशिंग फुंकले. मात्र, ‘आता तुतारी विरुद्ध मुतारी’ अशी नवी टॅगलाइनही चालवत अजित पवार गटाला चांगलेच डिवचले. सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफाॅर्मवर ही टॅगलाइन दोन दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. याला उत्तर देताना अजित पवार गटाची पुरती दमछाक झाली असली, तरी ‘विचार विखारी, मिळाली तुतारी’ असे म्हणत त्यांनीही शरदचंद्र पवार गटाच्या वैचारिक मर्मावर बोट ठेवले आहे.
शरद पवार गटाला चिन्ह तुतारी. आता काका आणि दादा यांच्यात लढाई ‘तुतारी विरुद्ध मुतारी’ अशा पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे काका-पुतणे गटाच्या वादात उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसचे कार्यकर्तेही ‘हीच ती वेळ आहे ‘हाता’त क्रांतीची पेटती ‘मशाल’ घेऊन विजयाची ‘तुतारी’ वाजवायची,’ अशा पोस्टमधून हात धुवून घेत आहेत.