पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी लाभदायक भरडधान्याचा सर्व वयोगटासाठी वापर व्हावा

0
183
  • जिल्हाधिकारी अमोल येडगे
    व्ही.टी.पाटील स्मृती भवन येथे ‘मिलेट महोत्सव 2024’ ची सुरुवात

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): भरडधान्य हे शरीराला पौष्टिक असून ते पारंपरिक पद्धतीने शेतकरी पिकवतो, खातो. नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या भरडधान्याचा फायदा लहान, तरुण तसेच वयोवृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणात होतो. सध्या सर्वांची आहारपद्धती बदललेली आहे. त्याच अनुषंगाने भरडधान्य(मिलेट) चे महत्व सर्वांना कळावे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. अशा या पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी लाभदायक भरडधान्याचा वापर सर्व वयोगटासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचे विभागीय कार्यालय कोल्हापूर व नाबार्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘मिलेट महोत्सव 2024’ चे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले की, गरिबांचे धान्य म्हणून असलेली भरडधान्यांची ओळख आता पुसलेली आहे. नैसर्गिक पद्धतीने शेतकरी भरडधान्य पिकवून अशा प्रकारच्या विविध मिलेट महोत्सवातून त्याची विक्री करीत आहेत.

भरडधान्याची दखल जागतिक स्तरावर घेतल्याने त्याचे मार्केटही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी भरडधान्याचा अधिक वापर सर्वांनी करावा. तसेच प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात, पाहुण्यांच्या स्वागतावेळी भरड धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ वाटप करावेत आणि यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन विविध पदार्थ चाखून पाहिले व स्टॉलधारक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले. ते म्हणाले, युनोने 2023 मिलेट वर्ष जाहीर केल्यानंतर अशा प्रकारचे महोत्सव मिलेटच्या जनजागृतीसाठी केले जात आहेत. कोल्हापूर येथे अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच मिलेट महोत्सव साजरा होत आहे. याठिकाणी महाराष्ट्र राज्यासह छत्तीसगड, गोवा येथून स्टॉलधारक सहभागी झाले आहेत, याचा फायदा कोल्हापूरकरांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात फित कापून व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे आभार जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव यांनी मानले. मिलेट महोत्सवाची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती, जिल्हाधिकारी यांनी झेंडा दाखवून तिला मार्गस्थ केले.
मिलेट महोत्सवातील आकर्षण


विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोस्तवांचा प्रमुख उद्देश आहे.

तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. कोल्हापूर येथे दि. 24 ते 27 फेब्रुवारी अखेर मिलेट महोत्सव सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. राज्याच्या विविध भागातून तृण धान्य उत्पादक, तृण धान्य प्रक्रिये मध्ये काम करणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

महोत्सवामध्ये 45 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असुन, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा असे विविध तृणधान्ये, यापासुन तयार करण्यात आलेले पदार्थ, ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने थेट उत्पादकांकडून विक्री साठी उपलब्ध आहेत. तसेच मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्य विषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृति स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here