
ताब्यात प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र मराठा बांधवांनी त्यांना मुंबईला जाऊ नये अशी विनंती केली. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बसही पेटवून देण्यात आली आहे. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचा आरोप केला आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेलीय. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे.
अंतरवाली सराटीहून निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील रात्री भांबेरी गावामध्ये थांबले होते. त्यांच्यासोबतच्या ६ ते ७ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जालना पोलिसांनी पहाटे ३ वाजता ही कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत जरांगे पाटील यांच्या कोर कमीटी मधील समर्थक ताब्यात घेतले असल्याचं समोर येत आहे.

