कोल्हापूरच्या जंगलात लवकरच येणार चंद्रपूरवरून दोन वाघ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर

0
176

कोल्हापूर : चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वनविभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखणी केली जात आहे.

हे वाघ ही कोल्हापूरचीही प्राणी संपत्ती ठरू शकणार असल्याने लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

पश्चिम घाटाच्या वैभवसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या व त्यातील समृद्ध जंगलांचा काही भाग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि याच जंगलात आता अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग असणारा वाघ विसावणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून २००७ ला घोषित झाल्यानंतर या जंगलातील वाघांचा सूक्ष्म अभ्यास राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत (नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी) व वनविभागामार्फत केला गेला.

कर्नाटकातील भीमगड वाइल्डलाइफ सेंच्युरी, गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य व महाराष्ट्रातील तिल्लारी, राधानगरी, आंबा, चांदोली, महाबळेश्वर, कोयना हा कॉरिडॉर वाघांचा मुख्य भ्रमण मार्ग आहे. येथूनच वाघांचे स्थलांतर होत असते; पण ते या जंगलात आपली हद्द तयार करून येथे राहत नसत हे अभ्यासानंतर लक्षात आले.

चार वर्षांपूर्वी प्राधिकरणाच्या अभ्यासकांनी या जंगलांचा सखोल अभ्यास करून कुरण विकास, पाणवठे वाढ, तृणभक्षक प्राण्यांची पैदास वाढ असे कार्यक्रम सुरू केले. उपवनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चितळांची पैदास करण्यात दोन वर्षे वनविभागाने जे विशेष कष्ट घेतले त्यामध्ये त्यांना यश आले. त्याचेच फलित म्हणून सतत स्थलांतर करणारे वाघ आता या जंगलात राहत आहेत, हे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून लक्षात आले आहे.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोल्हापुरातील जंगलात एक नर वाघ मुक्कामास असणे ही चांगली व महत्त्वाची घटना असून प्राधिकरणाने चंद्रपूरच्या जंगलातून चार वाघ आपल्या जिल्ह्यातील जंगलात सोडणार असल्याचे दोन वर्षांपूर्वी घोषित केले होते. आता या वाघांना येथे सोडण्याची योग्य परिस्थिती निदर्शनात आल्याने लवकरच चार वाघांपैकी दोन वाघ हे या जंगलात आणणार असल्याचे समजते. ते कोठे व कधी आणणार, याची प्राधिकरण व वनविभाग कमालीची गुप्तता पाळत आहे.

या वाघांच्या येण्याने जिल्ह्यातील जंगले ही अधिक समृद्ध तर होणारच आहेत; पण त्या वाघांची पुढची पिढी येथे जन्माला यावी व त्यांची डरकाळी आपल्या जंगलात पुन्हा ऐकू यावी, यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर.
  • वाघांसाठी बनवलेल्या विशेष गाडीतून प्रवास
  • विशेष नियंत्रित वातावरणाची गाडीत रचना
  • गाडी सुरू असताना वाघांवर नजर ठेवण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय.
  • सकाळी सहा ते बारा व सायंकाळी चार ते नऊ याच वेळात वाघांचे गाडीतून स्थलांतर
  • रेडिओ कॉलरमार्फत या वाघांवर दोन महिने लक्ष ठेवण्यात येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here