Kolhapur: कोयत्याने वार करत सराफाचा खून, आर्थिक व्यवहारातून स्वप्नवेल पॉईंटनजीक हल्ला

0
176

चंदगड : आर्थिक व्यवहारातून कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सराफाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी तिलारीनगर येथील स्वप्नवेल पाॅंईटनजीक कॅनाॅलजवळ घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चंदगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे.

बाळकृष्ण अनंत सोनार (वय ६७, मूळचे कालकुंद्री, सध्या रा. तुडीये) असे मृत सराफाचे नाव असून, संशयित आरोपी रमेश बाबू पाटील (५१, रा. तुडीये) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी की, रमेश याने सराफ बाळकृष्ण यांच्याकडून गेल्या काही वर्षांपूर्वी सोने खरेदी केले होते. मात्र, त्यातील काही रक्कम अद्यापही दिली नाही. यासाठी अनेकवेळा बाळकृष्ण यांनी रमेशकडे ती रक्कम मागितली; पण त्याने दुर्लक्षच केले.

मंगळवारी दुपारी मात्र तुझे पैसे देतो असे सांगून त्याने दुचाकीवरून सोनार यांना तिलारीनगर येथे नेले. स्वप्नवेल पाॅईंटनजीक कॅनाॅलजवळ ते आले असता रमेशने सोनार यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या हात, पाय व मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनार यांना तिथेच सोडून रमेशने पोबारा केला.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ओरडत असलेले जखमी सोनार निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी दुसरे पथक संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी तुडीये येथे आले असता रक्ताने माखलेले कपडे धुताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी सोनार यांचा उपचार सुरू असताना आठच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

सोबतचे सोने गायब?

बाळकृष्ण सोनार हे पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. नोकरीत असतानाच त्यांनी सोनार व्यवसायात जम बसवत तुडीयेला वास्तव्यास गेले. सोनार यांच्याकडे कायम सोने जवळ असायचे. मंगळवारीही त्यांच्याजवळ सोने होते. घटनेनंतर मात्र ते गायब झाले. त्यामुळे याबाबत उलटसुलट तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here