कोल्हापूरच्या दोन्ही जागा ठाकरे यांच्याकडेच, अरूण दुधवडकर यांचा निर्वाळा

0
177

कोल्हापूर : कोणत्याही प्रकारची मनात शंका घेवू नका. कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला असून या दोन्ही जागा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडे राहतील असा स्पष्ट निर्वाळा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी दिला आहे.

येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी दुपारी आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, विजय देवणे, सुनील मोदी, रवि इंगवले यांच्यासह माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.

दुधवडकर म्हणाले, काही दिवस कोल्हापूरच्या जागेबाबत येणाऱ्या बातम्यांवर जावू नका. मला उध्दव ठाकरे म्हणाले, कोल्हापूरबद्दल माझ्याकडे रिपोर्ट वेगळा येतोय. तेव्हा मीच त्यांना म्हणालो, मी प्रत्यक्ष कोल्हापूरला जावून येतो. म्हणून ही तातडीने बैठक बोलावली आहे. तुमच्यावतीने मी ठाकरे यांना शब्द देतो की तुम्ही आम्हांला लवकर उमेदवार द्या. ठाकरे गटाचे दोन्ही खासदार मातोश्रीवर घेवून येतो. मात्र साहेब, देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी राहण्याची गरज आहे. याचवेळी आभार मानताना रवि इंगवले यांनी पक्षाने पक्षातीलच उमेदवार द्यावा. आमच्यावर उमेदवार लादला तर मग कोल्हापुरात अवघड होतंय असे स्पष्टपणे सांगितले.

यावेळी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here