राजू, तू लोकसभेच्या कामाला जोर लाव, महादेवराव महाडिक यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

0
157

कोल्हापूर : राजू तुझे काम कोणत्याही पक्ष व आघाडीपेक्षा वेगळे आहे. शेतकरी चळवळीसाठी तुझ्या कामाची गरज असल्याने तू कामाला लाग असा सल्ला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला.

या दोघांचीही अतिग्रे (ता.हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठात बुधवारी सकाळी काहीवेळ योगायोगाने भेट झाली. निमित्त होते संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे.

शुभेच्छा देऊन बाहेर आल्यावर मान्यवरांसोबत घोडावत यांची चर्चा झाली. त्यानंतर पायऱ्या उतरत असताना नेहमीच्या स्टाइलमध्ये महाडिक यांनी शेट्टी यांच्या खांद्यावर हात टाकला आणि गर्दीतून थोडे बाजूला नेत आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा केली. महाडिक यांनी मला सातत्याने मदत केल्याची आठवण शेट्टी यांनी करून दिली. त्यावर महाडिक यांनीही मलाही राजू यांची वेळोवेळी व संकटाच्यावेळी मदत झाली आहे व ते मी विसरलेलो नाही असे सांगितले. हे दोघे बाजूला होऊन चर्चा करायला लागल्यावर तिथे गर्दी उसळली. लोकांची त्याबद्दल उत्सुकता ताणली होती. राजू, तब्येतीची काळजी घ्या, वजन कमी करा, व्यायामाकडे लक्ष द्या असाही प्रेमाचा सल्ला महाडिक यांनी शेट्टी यांना दिला.

त्यावर संजय घोडावत मिश्कीलपणे म्हणाले, महाडिक म्हणजे देवानंद आहेत. आजही त्यांची प्रकृती खणखणीत आहे. सुमारे आठ ते दहा मिनिटेच ही चर्चा झाली. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगामी लोकसभा निवडणूकीत शेट्टी यांची भूमिका एकला चलो रे अशी आहे. या मतदार संघात महाडिक यांची ताकद आहे. या भेटीमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची दिशा काय राहील याचेच संकेत मिळाल्याची चर्चा सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here