Summer Health Tips : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून रहावं आणि सतत गारेगार पाणी प्याव असं प्रत्येकाला वाटतं.
जोपर्यंत थंड पाण्याचा एक घोट घशामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आराम मिळत नाही. जरी थंड पाणी पिल्याने तहान भागते; परंतु जास्त थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त थंड पाणी तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे; परंतु ते पाणी कसे आणि कोणते पित आहोत याची खबरदारी घ्यावी.
मायग्रेन ट्रिगर करू शकते : अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. तसेच मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर तुम्ही आधीच मायग्रेनचे बळी असाल तर थंड पाण्यामुळे आणखी त्रास जाणवू शकतो.
थंड पाण्यामुळे शरीराच्या इतर अवयवांचं देखील नुकसान होतं. थंड पाणी पिल्याने नाकातील श्लेष्मल त्वचा कडक होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. सर्दी किंवा फ्लूची समस्या असल्यास थंड पाणी पिणे टाळा. त्यामुळे थंडीशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
पाण्याची कमतरता : उन्हातून फिरून आल्यानंतर पहिले थंड पाण्याची गरज भासते; पण तुम्हाला माहीत आहे का ? हेच थंड पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि हायड्रेशनसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात; मात्र उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
लठ्ठपणा वाढतो : थंड पाणी तुमच्या शरीरात साठलेली चरबी आणखी घट्ट करते. यामुळेच वजन कमी करण्यात अडचण येते. नेहमी थंड पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे वजन कमी करताना कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
पचनक्रिया समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिल्यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. कारण अन्न खाताना अतिशय थंड पाणी प्यायल्याने अन्न पचण्याऐवजी शरीर त्या ऊर्जेचा वापर पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी करते. त्यामुळे जेवताना जास्त थंड पाणी पिऊ नये असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम : उन्हाळा असला तरी नेहमी सामान्य पाणी पिण्याची सवय लावा. तसेच कोमट पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. कोमट पाणी पिणे हा तुमच्यासाठी पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. कोमट पाणी प्यायल्याने तहान कमी लागते. म्हणूनच उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावा.