सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात स्कॅम केले जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली असून तिला आलेला भयंकर अनुभव सांगितला आहे.
कावेरी नावाच्या युजरने स्कॅमर्स लोकांना लुटण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करतात हे सांगितलं आहे. तिने या स्कॅमची संपूर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये खोट्या पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
कावेरीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. त्याने स्वत:ची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की, तुमची मुलगी मोठ्या संकटात आहे. पोलीस असल्याचं भासवणारा हा स्कॅमर्स पुढे म्हणतो की, तुमच्या मुलीला तिच्या तीन मित्रांसह अटक करण्यात आली आहे. त्यांनी आमदाराच्या मुलाचा व्हिडीओ बनवून त्याला धमकावले आहे. तिला फोनवर आपल्या मुलीचा आवाजही ऐकू येतो. आवाज तोच होता, फक्त बोलण्याची पद्धत मात्र वेगळी होती. व्हॉईस ओव्हरमध्ये ‘मम्मा मला वाचवं’ असं ऐकू येतं. यामुळे कावेरीला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला.
कावेरी पोस्टमध्ये लिहिलं की, “सुमारे तासाभरापूर्वी मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी असे कॉल उचलत नाही, पण मी या कॉलला का उत्तर दिले हे मला माहीत नाही. पलीकडे एक माणूस होता, ज्याने तो पोलीस असल्याचं सांगितलं आणि मला विचारलं की माझी मुलगी कुठे आहे हे मला माहीत आहे का? मी त्याला सांगितलं की मला माझ्या मुलीशी बोलू द्या. त्याने रागाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मग तो म्हणाला की तो मुलीला कुठेतरी घेऊन जात आहे.”
या पोस्टला आतापर्यंत 6.89 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक पोस्टला खूप लाइक आणि शेअर करत आहेत. यावर लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक म्हणतात की आजच्या काळात खरे आणि खोटे फोन कॉल ओळखणे खूप कठीण झाले आहे. स्कॅमर्स तुमच्या नातेवाईकांच्या आवाजात बोलू लागतात. अशा परिस्थितीत फसवणुकीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी लोकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे.