भारताकडून ‘चायना किलर’ अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी, सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भात ड्रॅगननं केलं मोठं वक्तव्य

0
71

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनचा सूर बदलला आहे. चीनने सीमाप्रश्नासंदर्भात भाष्य केले आहे. सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविणे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे चीनने म्हटले आहे.

तसेच, दोन्ही देशाच्या नेत्यांच्या सहमतीने भारत आणि चीन लवकरच परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढतील, जो प्रासंगिक करारांनुसार असेल, अशी आशा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बुधवारी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, भारताने नुकतेच ‘चायना किलर’ म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे.

अग्नी-5 क्षेपणास्त्र हे भारताचे सर्वात लांब पल्ल्याचे MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही भारताच्या या क्षेपणास्त्राची प्रशंसा केली होती. याशिवाय चीनच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेनेही या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे वृत्त चिनी भाषेत प्रसिद्ध केले आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनच्या टिप्पणीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. चीनची टिप्पणी अस्वीकार्य आहे, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी म्हटले होते.

अरुणाचलवर दावा करत चीनने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. पीएम मोदींच्या अरुणाचल दौऱ्यामुळे सीमा विवाद अधिकच जटील होईल, असे चीनने म्हटले होते. याला भारताने कठोर भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here