झी चित्र गौरव या पुरस्कार सोहळ्याची प्रत्येक कलाकार मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो. मनोरंजन विश्वात आणि खासकरुन मराठी कलाविश्वात हा पुरस्कार सोहळा अत्यंत मानाचा मानला जातो. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला असून यंदा या सोहळ्यात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मोठ्या दिमाखात Zee Chitra Gaurav Puraskar 2024 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी,सारा अली खान यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती.
विशेष म्हणजे यावेळी अनेक लोकप्रिय कलाकारांनी पुरस्कारांवर त्यांची मोहर उमटवली आहे. यात उषा मंगेशकर यांना वयाच्या ८८ व्या वर्षी जीवन गौरव पुरस्कार दिल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
आजवरच्या कारकिर्दीत उषा मंगेशकर यांनी अनेक सुपरहिट गाणी कलाविश्वाला दिली. मराठीसह त्यांनी हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी, मणिपुरी अशा कितीतरी भाषांध्ये हजारो गाणी गायली.
यात खासकरुन लता मंगेशकर यांच्यासोबतच त्यांचं ‘अपलम चपलम’ हे गाणं तर तुफान लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामुळे बॉलिवूडमध्ये इतिहास रचला गेला.
दरम्यान, उषा मंगेशकर यांचं कलाविश्वातील योगदान, त्यांची कारकिर्द पाहता त्यांना या पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या सोबतच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार सोहळा १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.