
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
दिल्ली:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात शनिवार दि २३ मार्च रोजी रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली आहे. मात्र, यातील ५ जागांवरील उमेदवार बदलावे लागतील, अशी अटही घालण्यात आली आहे.
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होता ना दिसून येतोय.
लोकसभा निवडणूक जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला, तरी देखील महाराष्ट्रातील ४८ जागेवरील महायुतीच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपने मात्र, २० जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची माहिती मिळत आहे.अशातच जागावाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवार दि २३ मार्च रोजी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.या बैठकीत महायुतीचा जागावाटप निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ३०-१३-०४-०१ असा असणार आहे. भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली असली, तरी यातील ५ जागांवर उमेदवार बदलावे लागतील, अशी अट घालण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी, गजानन कीर्तीकर आणि सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं सांगितलं जातं आहे. या बाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

