प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): शुभमंगल सामुहिक विवाह योजनेअंतर्गत प्रति जोडपे देण्यात येणाऱ्या 10 हजार रुपयांच्या अनुदानात वाढ करुन मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 25 हजार रुपये इतके अनुदान तसेच सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे देण्यात येणाऱ्या रुपये दोन हजार ऐवजी रुपये 2 हजार 500 एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी दिली आहे.
शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजनेच्या अंमलबजावणीस जवळपास 10 वर्षाचा कालावधी उलटुन गेला असुन त्यानुसार महागाईच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार सुधारित शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजनेची व्याप्ती वाढवुन ती केवळ शेतकरी, शेतमजुर यांच्यासाठी न ठेवता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील वगळता अन्य प्रवर्गातील रुपये एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्त्पन्न असलेल्या निराधार, परित्यक्त्या आणि विधवा महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार लागु करण्यात आला आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती- वधुचा वयाचा दाखला (18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक), वराचा वयाचा दाखला (21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक), शासनाच्या विहित नमुन्यात रुपये 100 च्या स्टँम्प पेपरवर वधु वराने एकत्रित करावयाचे प्रतिज्ञापत्र, वधुचे डोमिसाइल प्रमाणपत्र, वधुच्या आईचा तलाठी यांच्याकडील रहिवाशी दाखला, वधुच्या आईचा विधवा / परित्यक्त्या / निराधार असलेबाबत तहसिलदार यांचेकडील दाखला, वधुच्या आईचा तलाठी यांचेकडील उत्पन्नाचा दाखला, वधु वरांचे आयकार्ड साईज फोटो 2 प्रती, विवाह संपन्न झाल्याची रंगीत छायाचित्रे व विवाह नोंदणी कार्यालयात विवाहाची नोंद केल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

