प्रतिनिधी मेघा पाटील
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हा गेली अनेक दिवस चर्चेत असलेला प्रश्न बुधवारी निकालात निघाला. राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी एकत्र आले नाहीत. महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच सत्यजित पाटील आबा यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील, आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी.सी. पाटील असे चार प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघात वंचितची मते ही लक्षणीय आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिल्यापासूनच एकला चलो रेचा नारा दिला होता. तर महाविकास आघाडीकडून त्यांनी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह होता. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर शेट्टी यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील न होता स्वाभिमानी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल हा आपला पवित्रा कायम ठेवला. यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी व शेट्टी यांच्यामध्ये एकमत होऊ शकले नाही. बुधवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील हे माजी आमदार आहेत. पन्हाळा- शाहूवाडी मतदार संघातून त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.

