

कोल्हापूर, दि.8(जिमाका): जिल्ह्यात लोकसभा निवडणुक कामात असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र सुरु आहेत. कृषी विभागाचे लिपिक महेंद्र चोपडे व शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी अरविंद ज्ञानदेव पोवार हे दिव्यांग कर्मचारी निवडणुकीच्या कामात सक्रिय सहभागी झाले आहेत. या दोघांनी दिव्यांगत्वाचे कारण न देता आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करुन या कामात असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांपुढे आदर्श घालून दिला आहे.

त्यांचे सकारात्मक विचार व कृतीबद्दल महेंद्र चोपडे व अरविंद पोवार यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करवीरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते केशवराव भोसले नाट्यगृहातील प्रशिक्षणादरम्यान पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा प्रशिक्षण सत्राचे नोडल अधिकारी सुरेश जाधव, सारथीच्या अपर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, कोल्हापूर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त संजय सरनाईक, तहसीलदार स्वप्निल रावडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी मान्यवर उपस्थित होते.


निवडणुक हा लोकशाहीचा उत्सव असून हा उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून निवडणुकीच्या कामात सहभागी व्हावे. निवडणुकीचे काम करायला मिळणे ही वेगळे काम करण्याची चांगली संधी समजून या संधीचे सोने करावे, असे आवाहन श्री. चोपडे व श्री. पोवार यांनी यावेळी केले.
*

