जिल्हा परिषदेमार्फत ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

0
171

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा सणाचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा, या उद्देशाने ‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र मुलांच्या पटनोंदणीसाठी सर्वेक्षण करुन दाखलपात्र मुलांची यादी तयार करणे, ती गावच्या, शाळेच्या दर्शनी भागात लावणे, शाळेची जाहिरात पत्रके तयार करुन पालकांना वितरीत करणे, विविध माध्यमांव्दारे शाळांची जाहिरात करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय गुढी पाडव्यादिवशी शाळेचा परिसर स्वच्छ करुन दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अगत्यपूर्वक शाळेत आमंत्रित करा, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करा, खाऊ द्या, पालकांना शाळेच्या जाहिरात पत्रकाचे वाटप करुन शासकीय योजना, जिल्हा परिषद शाळांमधील नाविन्यपूर्ण उपक्रम व शाळेच्या वैभवशाली परंपरेविषयी माहिती सांगा तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज भरुन त्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के पट नोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डिजीटल शाळा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (६ वर्षे पूर्ण असणा-या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहनही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here