
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी लावलेल्या ५ कोटींच्या पैजेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटांचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होत आहे. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक आखाड्यात उतरले आहेत. याचवेळी चंदगड इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संजय मंडलिकांना सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटींचा निधी देण्याची पैज लावली आहे.
संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यामध्ये ही शर्यत लावली असून सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचा शब्द धनंजय महाडिक यांनी दिला आहे.संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची घोषणा या सभेतून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमातून चांगलाच व्हायरल होत आहे.

