हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात आमदार प्रकाश आवाडे अपक्ष निवडणूक लढवणार..

0
293


प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी इचलकरंजीचे आमदार आवाडे यांनी स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी आज दि १२ एप्रिल शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची कोंडी झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. आमदार प्रकाश आवाडे हे गेली पाच वर्षे भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून सक्रिय होते.
प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात रंगत आणखीनच वाढली आहे. जैन समाजाचे तीन उमेदवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकडून माजी खासदार राजू शेट्टी तर वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील उमेदवार आहेत.इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी प्रकाश आवाडे व त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे या दोघांच्याही नावाची चर्चा होती. मात्र महायुतीने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे हे नाराज होते.
उमेदवारी घोषित करण्यापूर्वी प्रकाश आवाडे यांनी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here