ए वाय पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची भूमिका अखेर स्पष्ट; शाहू महाराजाना देणार उघड पाठिंबा.

0
270


प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठीची भूमिका अखेर स्पष्ट केली आहे. रविवार दि १४ एप्रिल रोजी सकाळी राधानगरी भुदरगड तालुक्यातील समर्थकांसह महारॅली काढून कोल्हापुरात नवीन राजवाड्यात छत्रपती शाहूंची भेट घेऊन आपण त्यांना पाठिंबा देणार आहोत. परंतु मी राष्ट्रवादी सोडलेली नाही. आपण फक्त लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराज यांना पाठिबा देत असल्याचे ए. वाय यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे खास मित्र असलेले ए. वाय. पाटील लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात ए. वाय. यांचे व्याही आणि भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर, अरुणराव इंगवले, बाबा देसाई, प्रताप कोंडेकर यांनी बिद्री येथे ए. वाय. यांची भेट घेऊन महायुतीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी भूमिका जाहीर करीन, असे सांगण्यात आले होते.
त्यामुळे महायुतीमध्ये नाराज असलेले ए वाय यांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास काँग्रेसचे पी.एन पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची खेळी यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शाहूवाडीच्या रणवीरसिह गायकवाड आणि ए. वाय. पाटील या जिल्हा बँकेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन संचालकांनी राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराना पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here