प्रथिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन हद्दीतील 3 हजार 851 शस्त्रे जमा करुन घेणे आवश्यक आहे. या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसीजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (ए) व (बी) मधील अधिकारान्वये पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांनी सादर केलेल्या यादीप्रमाणे व छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार 31 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 3 हजार 851 शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनकडे तात्काळ जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
भारत निवडणुक आयोग, राज्य निवडणूक आयोगाने भारतातील माहे जून 2024 मध्ये मुदती संपणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 48 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन (2) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने याबाबतची आचारसंहिता दि. 16 मार्च 2024 रोजी पासून जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या दोन लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात आणलेली आहे. लोकसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी, जिवीत हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा, हत्यारांचा, दारुगोळ्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
शासनाकडील गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती, गावातील, विशिष्ट समाजातील प्रभावशाली व्यक्ती, ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ऐनकेन प्रकारे संमिलीत होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्ती राजकीय पक्षाच्या प्रचारात अथवा राजकीय सभेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यक्ती प्रचारात अथवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाल्यास ते शस्त्र परवानाधारक असल्याने या बाबीचा गावात, त्यांच्या रहिवाशांच्या ठिकाणात अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडू शकत असल्याने अशा परवानाधारकांची तसेच मयत परवानाधारकांची शस्ते जमा करुन घेणे आवश्यक आहे.
एकूण परवानाधारक शस्त्र संख्या 6409, छाननी समितीचे दिनांक 05 मार्च 2024 रोजीचे बैठकीतील आदेशाप्रमाणे जमा करण्यात येणा-या शस्त्रांची संख्या 1603, स्वच्छेने जमा करण्यात आलेल्या शस्त्रांची संख्या 959, दिनांक 16 एप्रिल 2024 अखेर जमा करण्यात आलेली शस्त्रे 1547, छाननी समितीचे दिनांक 4 एप्रिल 2024 रोजीचे बैठकीतीत आदेशाप्रमाणे पेट्रोलपंप, कारखाने, बँका, एटीएम या ठिकाणाचे सुरक्षा गार्ड यांचे शस्त्र जमा करण्यापासून सवलत 52 व जमा करणेवर शिल्लक शस्त्रांची संख्या (4+5+6-2) 3851
शस्त्र परवानाधारकांना त्यांच्या परवान्यावरील शस्त्र जमा करण्याबाबतचा आदेश पोलीस विभागाने संबंधित शस्त्र परवानाधारकांना तात्काळ बजावावा. शस्त्र परवानाधारकांनी अशा आशयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत 7 दिवसाच्या आत शस्त्रे जमा करावीत. हा आदेश जिल्ह्यात दिनांक 6 जून 2024 रोजी अखेर अंमलात राहील. तसेच दिनांक 6 जून 2024 नंतर 7 दिवसांच्या आत संबंधितांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र परत करावे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांचे शस्त्र जमा करावयाचे आहे, त्यांचे शस्त्र जमा करुन ठेवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच शस्त्रांना जमा कालावधीत कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शस्त्रे जमा करुन घेताना ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील, याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.द.वि.स. कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे अपर जिल्हा दंडाधिकारी तथा कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.